
‘आत्मभान’च्या पहिल्या अंकाचे १४ जानेवारी २००८ रोजी प्रकाशन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, आंबेडकरी विचारवंत तथा ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाचे संपादक डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. सुरेश पुरी, ज्येष्ठ समीक्षक डॉ. कृष्णा किरवले, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. रूस्तुम अचलखांब आणि सोबत ‘आत्मभान’चे संपादक डॉ. संजीवकुमार सावळे, रमेश कोंदलकर, डॉ. दत्ता भोसले.
‘आत्मभान’बद्दल…
‘आत्मभान’ सुरू करताना आम्ही जाणिवपूर्वक निखळ वाङ्मयीन किंवा निखळ सामाजिक, निखळ राजकीय अशा चौकटीत अडकायचे नाही, असे ठरविले होते. कारण समाजात ‘आत्मभान’ पेरायचे असेल तर केवळ वाङ्मयीन चर्चा घडवून भागत नाही किंवा केवळ स्वप्नरंजन असणार्या कथा-कवितांची पारायणे करूनही भागत नाही. वास्तव स्वीकारलेच नाही तर वर्गखोल्यांत घडणार्या तात्त्विक चर्चा किंवा कल्पनेतून खरडल्या गेलेल्या कथा-कविता वांझोट्याच ठरणार हे लक्षात घेऊनच आम्ही ‘आत्मभान’चे स्वरूप निश्चित केले होते. बहुतेकांना अंक आवडल्यामुळे स्वरूपाबद्दल कधी चिंता वाटली नाही. त्रैमासिक अमूक एका चौकटीचेच असायला हवे, हे बंधनही आम्ही झुगारले.
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडींवर भाष्य करणार्या लेखांसह साहित्य, समाज आणि कला क्षेत्रात वेळोवळी होणारे संशोधन समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ‘आत्मभान’ने केलेले आहे. त्यामुळे साहित्य, समाज आणि कला क्षेत्रातील संशोधनाला वाहिलेले त्रैमासिक अशी ओळख ‘आत्मभान’ने गेल्या चौदा वर्षात निर्माण केली आहे. आज माहितीच्या युगात तंत्रज्ञानाचे महत्व यशोशिखरावर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती सेकंदच्या अवधीत सर्वदूर पोहोचत आहे. सद्यस्थितीत अनेक आव्हानांमुळे ‘आत्मभान’ची हार्डकॉपी वाचकांपर्यंत पोहोचवणे थोडे कठीण झालेले आहे. पोस्ट खात्यातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शहरांमध्ये अंकांचे वितरण नीट होत नाही. त्यामुळे आहे ते स्वरूप कायम ठेवत ‘आत्मभान’ने डिजीटल व्हायचा निर्णय घेतला आहे. ज्या वाचकांपर्यंत अंकाची हार्डकॉपी वेळेवर पोहोचत नाही त्यांना त्यांच्या मोबाईलवर अंक वाचता यावा, त्यांच्यापर्यंत सहज आणि जलद पोहोचता यावे, या शुद्ध हेतूने हा बदल आम्ही करीत आहोत.
जानेवारी-फेब्रुवारी-मार्च, २०२२ च्या अंकापासून ‘आत्मभान’ची वेबसाईट आम्ही सुरू करीत आहोत. या वेबसाईटवर ‘आत्मभान’ पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असेल. ‘आत्मभान’चे वाचक या नव्या बदलालाही निश्चितच दाद देतील, असा विश्वास आहे.
–संपादक, डॉ. संजीवकुमार सावळे
AATMABHAN Open access Multidisciplinary Research Journal © 2022 is licensed under CC BY 4.0